डोंबारीण

सकाळी सकाळी भावावर डोकं सटकलं होतं. एवढीच अपेक्षा होती की माझ्या फेयरवेल पार्टीला मला ड्रेस घ्यायला, त्यानं त्याचं क्रेडिट कार्ड मोकळेपणानं द्यावं. मी किमान ८५ वेळा त्याची सिक्रेट्स लवपली होती अाजपर्यंत. सिग्रेट पासून मुलींपर्यंत. महिनाअखेर म्हणे! हे काय कारण झालं का? अाणि क्रेडिट कार्ड तर मागितलं होतं. बरं मी कधीच दीड हजाराच्यावर ते स्वाईप करत नाही, हे माहितीये त्याला. त्याचे पैसे वापरते मी, उकळत नाही. मला ते अावडतंच नाही! काय झालं असतं? मी ड्रेस घेतला असता, घातला असता अाणि मग शांतपणे तो कपाटात लपवला असता. अाईला कळलं सुद्धा नसतं! त्यानं ‘नाही’ म्हणणं, प्लॅनमध्ये नव्हतंच अजिबात. पण दिला दगा. मग मी पण काही कमी नाही. तो बाहेर गेल्यावर सरळ त्याच्या कपाटातून सगळी मिळालेली लव लेटर्स जमिनीवर सांडून अाले. अाता बघेल अाई अाणि व्हायचा तो तमाशा होईल. नाहीतरी अामच्या दोघांतलं बॉंडिंग जाम बिघडलंय. अाजकाल तो काही गिफ्ट देत नाही की मला उशीर झाला तर घ्यायला येत नाही. काहीतरी जाम गंडलंय! पण काय ते कळत नाहीये! शून्य संवाद, शून्य प्रेम! अाधी असा नव्हता दादा. अामच्या ना अाता चॉईसेस बदलल्या अाहेत. मी इंडिपेंडेंट झालीये. सगळीकडे माझी गाडी घेऊन जाते. त्याला माझी प्रगती अावडत नसणार. तो जळत असणार माझ्यावर किंवा माझा एखादा मित्र अावडत नसेल. किंवा एखादी मैत्रीण अावडत असेल! काय ते माहित नाही. पण पटत नाही. अाम्ही एकमेकांसाठी काहीही करत नाही अाणि केलं तर ते त्रास द्यायलाच करतो! त्यात अाता ही सुरभी नावाची मैत्रीण भेटायला येणारे मला. तिचं अाणि तिच्या भावाचं फारच मस्त पटतं. त्यानी तिला प्ले स्टेशन दिलेलं मागच्या वाढदिवसाला. ती रोज भावाचं कौतुक करते अाणि अाजकाल मला त्याचा फारच त्रास होतो.

एक नेहमीसारखं चिंगूपणे चीज घातलेलं अॉमलेट घेऊन मी कमीत कमी ऊन असलेलं टेबल शोधलं. सुरभीचा मेसेज अाला, ‘उशीर होतोय’. बरं वाटलं. अाता किमान शांतपणे खाता तरी येईल. पण कसलं काय. काहीतरी टणटणलं जवळच. कसला तरी वाद्यांचा अावाज. डोंबारी करतात तसा. झालं! अाता हे येणार अाणि डोक्याशी ती वाद्य बडवत बसणार. ह्या गरीब लोकांविषयी, सिग्नलवर भीक मागणाऱ्यांविषयी लोकं एकतर कीव आणि दया दाखवून बोलतात किंवा सरळ बोलतंच नाहीत. पण मला असा दिखावा करण्याची गरजच नव्हती. मला राग येतो या लोकांचा. अनेकदा हातीपायी धड असतात पण कामधंदा करत नाहीत. वाद्यांचा अावाज वाढत गेला. एक डॅशिंग बाई, तिच्या मागे १५-१६ वर्षांचा एक मुलगा, ७-८ वर्षांची एक मुलगी अाणि एक दोनेक वर्षांचं मूल, असा सगळा लवाजमा चालत अाला. मला टाईमपास नव्हता, म्हणून मी बघत बसले. कानात माझे इयरफोन्स घातले. त्यांचं ते बेसूर तुणतुणं माझ्या थेट मस्तकात जात होतं.

झपाझप डांबरी रस्त्याला भोकं पाडून त्यात बांबू रोवले. बाई ठिय्या देऊन वाजवायला बसली. मुलीनी एक लांब लाठी, एक रिंग असं सामान काढलं. अंगातून हरप्रकारे रिंग घालण्यात अाणि काढण्यात ती मग्न झाली. मुलाचे ते खांब अॅडजस्ट करुन झाल्यावर बाईनी एका बाजूनी एक खांब धरला अाणि त्या दोनेक वर्षाच्या बाळानी दुसऱ्या बाजूचा. त्याला साधा स्वतःचा तोल सांभाळता येत नव्हता, पण ५ बाबूंचं एक असा उभा राहिलेला डोलारा त्यानं सांभाळला होता, ज्यावर त्याची मोठी ताई अाता चढली होती. कोणीच कोणाशीच काहीच बोललं नाही. ना ती मुलगी तिच्या दादाला म्हणाली की, “मी पडले तर सांभाळ हं!”, ना तो भाऊ त्याच्या छोट्या भावाला म्हणाला, “बांबू नीट धर!”, ना ती अाई कोणाला काही म्हणाली. संवादाशिवाय त्यांचा खेळ सुरु झाला. ती लहान मुलगी एकदा काठी धरुन, एकदा चप्पल घालून, एकदा परातीत उभं राहून, त्या दोरीवरुन चालत होती. भाऊ बरोबर, तिच्या बाजूनं चालत होता. पण तिला पकडायला तो सज्ज अाहे, अशी शंकाही कोणाच्या मनात अाली नसेल. तिच्या दादानं तिला प्ले स्टेशन दिलं असेल का कधी? की ते तासन्‌तास खळखळून हसत, गप्पा मारत बसले असतील? संवादामुळे त्यांचं नातं अबाधीत असेल? की ती खरंच पडली असेल अशी एकदा दोरीवरुन अाणि त्यानं झेललं असेल? कसं असेल यांचं रक्षाबंधन? की यांच्या नात्यात भावाची वर्षातून एकदा खुंटी बळकट करत नाही बहीण? अाम्ही तरी का करतो? राखी बांधली नाही तर अाम्हाला गिफ्ट मिळत नाही पण भाऊ असणारच असतो ना पाठीशी? मला काहीही सुधरत नसताना, माझ्यासमोर सुरभी येऊन बसली. तिच्या दादानी तिला दिलेलं क्रेडिट कार्ड समोर ठेवलं अाणि मी माझं ठेवेन या अपेक्षेने माझ्याकडे बघितलं. मी तिच्याकडे एकदा नजर टाकली. नवीन जम्पसूट होता. केस अाज कलर करुन अाली होती. लिपस्टिकही नेहमीपेक्षा वेगळी होती. पण ती एक नजर पुरेशी झाली. त्या काही मोजक्या क्षणांपलीकडे ती माझं लक्ष वेधू शकली नाही.

मी परत माझ्या मैत्रिणीकडे वळले. अाता ते संगीत मधुर वाटत होतं. त्या हालचाली मोहक वाटत होत्या अाणि त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर एक अात्मविश्वास होता. ‘मी पडणार नाही’ असा अात्मविश्वास नव्हताच तो! ‘मी पडले तरी मला लागणार नाही’ असा असेल कदाचित! सगळ्यांनी सतत अाजूबाजूला असायलाच हवं असतं का? माणसं त्यांच्या त्यांच्या जागी असतील अाणि वेळ अाली की मगच अाजूबाजूला प्रगटली तर? नाही चालणार का? क्रेडिट कार्ड तर क्षुल्लक वाटतंच होतं अाता पण लहानपणापासून बरंच काही चुकतंच गेलंय, असंही वाटलं. त्यांचा खेळ संपला होता.

ते लहान मूल सगळ्यांसमोर जाऊन हात पुढे करुन उभं होतं. अाशाळभूतासारखं. सगळ्यात जास्त पैसे त्यानं गोळा केले. त्याला पैसे म्हणजे काय याची जाणीव असेल? त्याला माहित असेल की तो डेबिटवर जगतोय अाणि तो ज्यांच्याकडे पैसे मागतोय त्यातली अनेक लोकं, क्रेडिटवर मोठमोठ्याला गोष्टी घेतायेत? मुळात त्याला ही दरी म्हणजे काय? हेच माहित नसेल ना? त्यानं सगळी नाणी त्याच्या अाईच्या पुढ्यात अाणून टाकली. सगळा पसारा अावरुन ते एका कोपऱ्यात जेवायला बसले. भाकरी होती अाणि काहीतरी चटणी सारखं असावं. सगळ्यात अाधी ते लहान बाळ जेवलं. सगळ्यांनी जेवू घातलं त्याला. मोठा मुलगा त्याची भाकरी घेऊन दुसऱ्या झाडाखाली गेला. मुलगी अाणि अाई एकमेकींशी काहीही न बोलता जेवल्या. त्या जेवताना ते बाळ एकदा रस्त्याच्या मध्येच गाड्यांच्या रहदारीत गेलं. त्याच्या जीव काही क्षण धोक्यात गेला, तरीही मला बरं वाटलं. असं वाटलं, ह्या बाळात काहीतरी असं अाहे, जे इतर बाळांसारखं अाहे. काहीतरी अाहे जगात, जे ह्याला समजत नाही. ज्याचं गांभीर्य ह्याच्यापर्यंत पोहचलं नाहीये. ज्यानं त्याला प्रौढत्वं अालं नाहीये. सुरक्षेचा तर मुद्दाच नव्हता. त्याच्या दादाची, त्याच्यापेक्षा मलाच जास्त खात्री होती. खात्रीप्रमाणेच, दादानं झपकन्‌ त्याला उचलून अाईपाशी टाकलं अाणि अापलं झाड गाठलं. ह्याच दादानं ह्या बाळाला भीक मागायला शिकवली असेल? त्यानं केलं तसं बारीक तोंड अाणि अधाशी चेहरा करायला कोणी शिकवला असेल? कसं काय त्यानं तो चेहरा ग्रास्प केला? त्याला सांगण्यात अालं असेल की अाईचं जसं सकाळी तोंड असतं, तसंच कर! अधाशी चेहरा तर त्यानं रोजच बघितला असेल ना? जेवण झालं, सामान काखोटीला मारलं अाणि ते बिऱ्हाड निघालं. लहान मूल बागडत, ती छोटी हिरॉईन तिची काहीतरी हेयरस्टाईल करत, दादा ओझं वाहत अाणि अाई तंबाखू मळत!

अाणि मी? मी राहिले त्या तुटपुंज्या चीजकडे बघत; सुरभी क्रेडिट कार्डासमोर, माझ्या डेबिट पैशांचं अॉमलेट अधाशीपणे गिळत, तिच्या भावाचं कौतुक करत, माझ्या भावाशी तुलना करत पण माझ्या कानात घुमत राहिलं ते एकच तुणतुणं!