दणका खाणारी बायको

माझी उंची चार फूट अकरा इंच. नाजूक, पातळ अावाज, बोलके डोळे, हनुवटीवर तीळ अाणि गालावर मोठ्ठी खळी. मुलीकडे बघितलं तर हिचा जन्म फक्त चेहऱ्यावर अानंद घेऊन वावरायला अाणि तो इतरांना वाटायला झाला अाहे, असंच वाटेल असं मी नाही, माझी माई म्हणायची. पण अाज तिच्या मनूचे डोळे पार सुकले होते. गाळायला एकही टिपूस नाही, असे कोरडे ठण्ण! त्यांचा किलकिलाट, कुजबूज, चेहऱ्यावरच्या हास्याबरोबर खळीचं थरथरणं, यातलं काहीच नव्हतं. एक भयाण रिकामपण होतं. का कोण जाणे? हालचाल झाली तर ती फक्त हाताची, उभ्या दरवाज्याची बेल वाजवण्यापुरती. कानात मात्र ह्या दाराच्या अाठवणी होत्या. उंबरठ्यावरुन उडी मारुन जातानाचे खिदळणारे ढग होते. दार उघडण्याचा अावाज अाला. दारात माई उभी होती. मी माईच्या अंगावर संपूर्ण भार टाकून कोसळले. चारही बाजूंना भिंती असताना तो एकमेव टेकू वाटला तेव्हा. माझे हात माईच्या गळ्याभोवती घट्ट अावळलेले होते. पण माईने मात्र तिचासावधानपवित्रा सोडलाच नाही. भरतीची एक लाट येऊन गेल्यावर मी सावरले. बॅग उचलली अाणि अात पाऊल टाकू लागले. माई मात्र जागेवरुन हलेना. मुलीच्या डोळ्यांत अाईला सगळं दिसतं, खास करुन लग्न झालेल्या मुलीच्या. मग माई? मी कायमची परतले अाहे, हे तिला नसेल का कळलं? मनात भिती होती की अाता माईला गोष्टींचा उलगडा करुन सांगावा लागणार की काय? पण एक ठाम अावाज अाला. “मानेवर व्रण कसले?”. थोडा थोडका नाही, तब्बल १२ वर्षांचा संसार माझा. सहवास किंवा वनवास. या दरम्यान एकन्एक जखम मी शिताफिनी लपवली. कधी गळ्यात ओढणी घेऊन, कधी लांब बाह्यांचं ब्लाऊज घालून. पण अाज परिस्थिती अशी अालीये की संसारच उघडा पडतोय. त्यात जखमा झाकून काय होणार? मान खाली, अावाज कापरा – “त्यानं मारलं. घर सोडून अाले.” माईचा चेहरा बघण्याचीही हिंमत नव्हती माझ्यात. “मग पुढे?” तिचा अावाज धारदार. काय बोलावे मला माहित नव्हते, तोंडाटून सुटून गेलं, “अायुष्य जाईल, तसे जाईल.” तिनी ठामपणे सांगून टाकलं, “रडताना अायुष्य सहज जात नाही, ते ढकलावं लागतं अाणि मला ते शक्य नाही.” काही समजायच्या अात, घराचा दरवाजा बंद ही झाला होता.

माझी पावलं मागे वळली खरी, पण कुठे जायचं माहित नव्हतं. माई मागासल्या विचारांची नव्हती. नवऱ्यानं मारलं म्हणून अालेल्या मुलीला घराबाहेर काढणारी नव्हती. मग माईला नक्की काय सांगायचं होतं. माई जेव्हा ठामपणे बोलायची तेव्हा नेहमीच तिच्या म्हणण्याचा अर्थ सरळसोट नसायचा. मी रस्त्यानी चालायला लागले. माहित नव्हतं कुठे जायचंय. पण मन किंवा बुद्धी कोणीतरी एक जण सतत सांगत होतं की अाता थांबायचं मात्र नाही. झपझप पावलं, रणरणतं ऊन. डोकं जसं वरुन तापायला लागलं, तसंच अातूनही संतापायला लागलं. माई काय म्हणाली असेल? खरंतर तिनं फोनवरुन मकरंदला झाप झाप झापायला हवं होतं. तसंच तर करायची लहानपणापासून ती. मी जखमा का लपवल्या तिच्यापासून? कारण मुलीच्या अाईनं जावयाला धमकावणं काही बरं दिसलं नसतं अाणि मुलीनी नवऱ्याला धमकावणं तर शक्यच नव्हतं.

शाळेत मागच्या बाकावर बसून त्या ओजसनं माझ्या पाठीत कर्कटकानी नक्षी कोरली होती एकदा. छान छान म्हणत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दुखत होतं, झोंबत होतं. मी काही काही बोलले नाही, कारण सगळे हसत होते. अापण मध्येच अाडमुठेपणा करुन हे सगळं कसं थांबवणार? घरी अाले अाणि हा प्रसंग माईपासून लपवला. उघडी पाठ वळवून वळवून नक्षी बघत राहिले. कमरेला पार रग लागली पण दिसलं काहीच नाही. दुसऱ्या दिवशी रंगेहाथ पकडली गेले अाणिमनू अामची गोळाअसं मोठ्यानं वाचलं माईनं. फार फार वाईट वाटलं होतं तेव्हा. असं कसं वागली ओजस. पण धक्का तो नव्हताच. माझा हात धरुन माईनं तिच्या घरी फरफटत नेलं अाणि ओजसच्या अाईशी बोलून तिला चांगलं सुनावलं. मी अगदी कळवळले. माईनं मला एवढं झापलं असतं तर दिवस दिवाणाखालनं बाहेरच अाले नसते मी. अशी माझी पार्श्वभूमी असताना, मी काय उलट बोलणार मकरंदला? माईला नेहमी वाटायचं की मी शूर असावं पण ते काही जमलं नाही. मग माझ्याजागी माझी शूरवीर अाईच लढत राहिली.

सावलीत एका झाड्याच्या बुंध्यापाशी माझी ट्युब पेटली. माई झटली माझ्यासाठी, अगधी लहानपणापासून. स्वतःच्या नवऱ्याशी कायम भांडत राहिली , माझं चांगलं व्हावं म्हणून. एका छताखाली दोघं जण वेगवेगळे विचार घेऊन वावरत राहिले. मला त्यांच्यात एकी करावी हे कळलं ही नाही. कळलं तेव्हा अाण्णा निघून गेले होते दूर! दार लावून माईनी मला जसं काही संधीच दिली होती. माझा संसार मोडणं तिला कधीच पसंत नव्हतं अाणि मी मार खाणं ही. पण मी एका कात्रीत अडकले होते. अाज उलगडा झाला.

लॅचचा अावाज झाला. समोर मकरंद लोळत पडला होता. बाजूला एक ग्लास होता. त्यावर एक माशी भुंगभुंग करत होती. मी रात्री मकरंदला करुन दिलेल्या कॉफीची किंमत उशीरा का होईना पण त्या माशीनी जाणली होती. बिचारी माशी. मी खसकन तोच कप उचलला अाणि ती कॉफी भसकन्मकरंदच्या अंगावर फेकली. तसंही तो शर्ट विटलाय सांगून तीनेक महिने झाले होते. मकरंद दचकला. ताडकन्उभा राहिला. मी खाली बसले. हे असं तो उभा, माझं बसणं अगदीच दुर्मिळ. पण छान वाटलं. अात्ता खरंतर माझ्या पेकाटात त्यानं लाथ घातली असती, अगदी तशीच जशी नेहमी घालतो, तर मी पुढचे किमान चार तास कळवळत जमिनीवर पडले असते. पण कोण जाणे, तो दचकला, कॉफी डोळ्यात गेली की मक्या बदलला काय माहित? संतापानी कापत मात्र होता. कॉफी ठेवली होती तेच टेबल, रागात माझ्या अंगावर ढकललं. मी वेळीच हातानी अडवलं. उभी राहिले. मक्याच्या दोन कानशिलात दिल्या. शक्ती इतकी लागली कारण मला मक्याचा राग नाही. माझा स्वतःचा राग होता. “स्वतःचा राग खूप खोल असतो. उडी मारायला उपयोग केला तर नभात पोहचाल अाणि नाही तेव्हा अति वाकलात तर बुडून जाल.” माई म्हणाली होती मला असं एकदा. टणकन्माझ्या डोक्यात एक काठी बसली. झिणझिण्या अाल्या. दोन कानशिलात खाऊनही मक्याच्या किडकिड्या देहात एवढा जोर? बहुधा त्याला मजा येत असावी. समोरुन प्रतिकार नसताना मारुन विजय मिळवणे म्हणजे दुबळेपणाचं लक्षण. माझं सबळ होणं, इथे त्याला सबळ करतंय, हेच अामचं लग्न असेल बहुतेक. सगळं गरगरत होतं, तरीही त्याची मान मी धरली अाणि काडकन्अावाज येईतोवर वाकडी केली. “असं केल्यानी समोरचा बराच काळ उठू शकत नाही, पण म्हणून काही तो मरत नाही बरंका!”. माईचं बोट धरुन मी शाळेतलं कराटे बघत होते. “एेकलंस मिने?” मुंडीहोअशी डोलवत मनातल्या मनात मी म्हटले होते, “sss… कशाला कोणाची मान मोडायची?”. अाज या प्रश्नाचं माझ्याकडे सविस्तर, सपुरवणी उत्तर अाहे. मक्या माझ्यासमोर कळवळत पडला होता. एकदम त्याला उचलावंसं वाटलं. मलम पट्टीचे विचार अाले. त्यालाही येत असतील मला मारल्यानंतर माझ्या काळजीचे विचार? ह्या भावनिक गुंत्यात जास्त पडता मी मक्याएवजी फोनचा रिसिव्हर उचलला. माईचा नंबर लावला, “हॅलो…” विजयी भावमुद्रेनं मला बरंच काही सांगायचं होतं. “फार मारलं नाहीस ना?” काळजीनी माई म्हटली. मी थक्क झाले. रिसिव्हर गळून पडला. त्यावर काहीच बोलायच्या अात मागे उभा मकरंद दिसला. हातात सिनेमातल्या सारखा फ्लॉवरपॉट होता. त्यानं तो माझ्या डोक्यात पुनःश्च हाणला पण अाता या नवीन सबळ मनूनी त्याचा नेम चुकवला. “यापुढे तुझ्या एका दणक्याला मी चार दणके देईन.” माझ्या वाक्याचं मला कौतुक वाटलं. मक्याला काय वाटतंय याचा प्रश्न पडण्याअाधीच तो हेलकावत कोसळला. मी बॅग उचलली अाणि कपाटात कपडे लावायला अात जाणार इतक्यात रिसिव्हरची अाठवण झाली. ठेवण्याअाधी सवयीनं कानाला लावला. “‘चार देण्यासाठी, एक खाण्याची गरज नाही. अरे!’ लाका रे!’ ही प्रतिक्रिया असू शकते. निवाडा असू शकत नाही.” माईनं फोन ठेवलाच नव्हता. “अाता पाघळून तिथंच कुढत बसू नकोस. खिचडी टाकते अाहे.” कित्ती कित्ती ओळखते मला माई! या परक्या अनोळख्याच्या घरात त्याचं हवं नको बघता बघता मला विसरच पडला होता. बॅग ओढत मी निघाले. मक्यानं माझा पाय धरायचा प्रयत्न केला. खरंतर धरायचा म्हटलं तर फारच चांगला अर्थ निघतो. खेचायचा म्हणायला हवं. अंगी दणका मुरल्याप्रमाणे मी अडखळता गाढवासारखी लाथ मारुन निघाले ही! फरक एवढाच की सुकलेले डोळे परत पाणीदार झाले होते अाणि माझं नाव दणकादेणारीबायको झालं होतं!