दाग अच्छे होते है?

डॉक्टरांकडे नेहमीच कसा अापला नंबर बारावातेरावा असतो अाणि ती रिसेप्शनिस्ट नेमकं अापण अालो तेव्हा इथे उपस्थित नसलेल्यांनाच अात पाठवत असते. अापण एकटक बघायचं तिच्याकडे अाणि तिचं लक्ष वेधून घ्यायचं की बाई मी इथे अाहे बरंका! मी नेहमीची पेशंट अाहे अाणि डॉक्टर माझ्या चुलतभावाच्या मामे बहिणीच्या सासूबाई अाहेत. खरंतर मी थेट अात जायला पाहिजे पण मलाच लग्गा लावायला अावडत नाही म्हणून बसली अाहे शिस्तीत.

ते बघापुढची बाई गेली अातपरत एकदा अाठवण करु का? अाता पावणे अाठ होत अाले. पण बोलायला गेले की ती खेकसणार अंगावर. त्यामुळे नकोच. तेवढ्यात माझं लक्ष शेजारच्या बाईकडे गेलं. तिनं अगदीमी तुमच्या मनातलं जाणते होअशी समदुःखी स्माईल दिली. मला जरा बरं वाटलं. अागाऊपणात सहकारी मिळाला.

झालं? ही बाई तर नक्की माझ्या नंतरच अाली होतीकी अाधी येऊन नंबर लावून गेली असेल? मी पण असंच नंबर लावून कूकर करुन यायला हवं होतं. असो. अाता माझ्या समदुःखी शेजारणीचा नंबर अाला. पण ती ढिम्म हलली नाही. नंबर सोडला? मुलीची वाट बघत असेल. मी परत तिच्याकडे बघून हसले पण ती हसलीच नाही. काय झालंय नेमकं? तिच्या नंतरच्या नंबराची बाई अात गेली, बाहेर अालीतरीही हिची लगबग नाही. कोण जाणे मला काही वाटेना की कोणाची वाट बघतीये. वारंवार घड्याळ बघणं नाही. कोणाला फोन नाही. मग? परत एकदा पुढचा नंबर अात गेला. ही इकडेच.

तुम्हाला हवीये ना appointment? की cancel करु?” पहिल्यांदा मला वाटलं की ह्या रिसेप्शनिस्टचा काहीतरी उपयोग अाहे. अाता काय बरं उत्तर देईल ही? मी कान टवकारुन बसले. “cancel नका करु, शेवटी जाईन.” इतका समजूतदारपणा अाजच्या बायकांमध्ये असतो? हिला कूकरची घाई नाही? मंगळसूत्र तर अाहे, मग? राजाराणीचा संसार असेल, हिचा राजाच स्वयंपाक करत असेल का? ही इतकी समजूतदार मग तो? तो ही असाच असेल? मी अशी वागायला लागले तर माझा नवरा पण असाच बदलेल? ह्या विचारांची खरंतर गरज नव्हती पण सगळेच विचार काही माझ्या हातात नाहीत. तर मुद्दा असा की एवढा समजूतदारपणा अाला कुठून? हिच्या emergency मध्ये कोणी हिला असाच नंबर दिला होता का? हिचा किंवा जवळच्या व्यक्तीचा जीव वगैरे वाचला त्यामुळे? की पहिल्यापासूनच ही अशी अाहे?

अाता तिनी माझ्याकडे बघितलं. मी कसनुशी हसले, माझ्या मनात नंबराची घाई असताना हिने संतगिरी करुन मला पुरेसं लाजवलं अाहे. इतक्यात अाम्ही बसलेल्या तुटपुंज्या सोफ्यापाशी एक वयस्कर बाई येऊन उभ्या राहिल्या. अाता ही लगेच उठून त्यांना जागा देईल अाणि परत एकदा सगऴयांची मनं, किमान माझं मन जिंकेल. मी घाईनी उठले. प्रश्न समजूतदारपणाचा होता ना! खरंतर त्या बाईचं इतकीही वय झालं नव्हतं. माझ्यापेक्षा वर्ष मोठी असेल पण दया येईल अशा प्रकारे चालत अाली अवजड देह घेऊन. अाता हिने इतकं हाणलं अायुष्यभर ही काही माझी चूक नाही. त्यात व्यायामाच्या नावानी भोपळा असेल. असो! वाईट नको बाबा. मनात वाईट नको. मग जागा दिल्याचं पुण्य कसं लाभणार?

मी मला उभं राहायला एक कोपरा गाठला अाणि माझ्या निरीक्षण स्थळाकडे टक लावून थांबले. पण अाता सोफ्याच्या मध्यात बसलेली समजूतदार बाई, त्या वयस्कर बाईला चेंबून बसली होती. तिच्या दुसऱ्या बाजूला जागा असतानाही ही हलली नाही? हे काय नवल? अाता मात्र तिला गदागदा हलवून विचारावसं वाटलं होतं की, “बाईगं तुझं काय ते एकदाचं ठरव अाणि सांगून टाक. तू अाहेस की नाही समजूतदार? की तुझ्यापायी मी माझी जागा उगाच घालवून बसले?

मनात कितीदा हे थेट प्रश्न केले पण जाऊन विचारायचं धाडस नाही. कोपऱ्यात तशीच विचारात उभी असताना मला दिसलं की अातून माझ्या नंतर येऊन नंबर लावलेली बाई बाहेर अाली. म्हणजे काय? ह्या विचारांच्या नादात मी माझा नंबर घालवला? मी भानावर अाले तेव्हा ती रिसेप्शनिस्ट मलाच विचारत होती, “तुम्हालाही शेवटीच जायचं अाहे का?” खरंतर मला घाई होती. घरी शेवगाच्या शेंगा घालून अामटी करायची होती, मेथीची गोळा भाजी माझी वाट बघत होती अाणि मुख्य म्हणजे जरा नऊचे सव्वा नऊ झाले की कावळे कावळे म्हणणारी मंडळी होती. पण नेमकं काय संचारलं कोण जाणे. अाज काय तो सोक्ष मोक्ष लावायचा ठरला. मी संगितलं, “अाधी ह्या म्हाताऱ्या, गरजू, अाजारी बायकांना सोडा. अाम्ही कायथांबू की. एकमेकींना साथ द्यायलाच हवी. शेवटी गायनॅककडे अाहोत. स्त्रियांनीच इथे स्त्रियांशी चढाओढ केली तर कसं चालेल?” उरलेल्या तिनही बायकांनी माझ्याकडे दचकून बघितलं. काय बोलले मी अात्ता? पण मरु दे! त्या निमित्तानी व्यायामाचा भोपळा तरी अात गेला अाणि जागा झाली. मग मी त्या जागी गेले अाणि त्या दुसऱ्या स्त्री शक्तीला म्हणाले, “थोडं सरकता का? मला बसायचं अाहे.” मारली की नाही सिक्सर? अाता एकतर तिला सरकावंच लागेल अाणि नाहीतर सांगावं लागेल की मॅटर क्या है? पण ती सरळ म्हणाली, “बसाअाहे भरपूर जागामी हिरमुसून बसले.

घड्याळाची टिकटिक अाणि माझ्या मोबाईलची रिंग दोन्ही थांबत नव्हत्या पण क्लायमॅक्सशिवाय जायचं नाही. शेवटी उरलेली एक बाईही अात गेली. अाता ती बाहेर अाली की मी माझा फोन काढून बोलायचं नाटक करणार अाणि हिला अात जावं लागणार! वय वाढलं पण अायडिया कशी यंग अाहे माझी! इतक्यात अातली बाई बाहेर अाली अाणि हिनी माझ्या अाधीच फोन कानाला लावला. रिसेप्शनिस्ट माझ्याकडे अाशेनी बघू लागली. मी गेले अात पण लक्ष सगळं बाहेर. अाता बाहेर गेलं की बोलायचं तिच्याशी. ठरलं. माझी तपासणी झाली. नेमकी अाज माझ्या चुलत भावाच्या मामे बहिणीच्या सासूबाई, म्हणजेच डॉक्टरीणबाई गप्पांच्या मूड मध्ये होत्या. त्यांना कशीबशी टाळत बाहेर अाले अाणि ती बाई गायब. रिसेप्शनिस्ट खाली वाकून काहीतरी फाईलींचे गठ्ठे ठेवत होती. मी विचारलं, “त्या बाई?”. ती थंडपणे म्हणाली, “अात्ता तर होत्या वाकले तेव्हा…” मी जिन्यानी भराभरा उतरले, पहिल्या मजल्यावर मला ती दिसली. लेमन कलरची साडी अाणि मागे रक्ताचा मोठ्ठा लाल डाग! मी थबकले. एका गायनॅककडे एक बाई ह्या कारणासाठी तीन तास बसून होती? मला चपराक मारल्यासारखी झाली. इतके का अापण मोकळ्यानं वागू बोलू शकत नाही की हा डाग घेऊन वावरता येऊ नये? बायकांच्यात? दर महिन्याला पाळी येते, अायुष्यभरात १२ ते ४७ वर्ष अशी जर रफ फिगर असेल तर ३५ वर्ष म्हणजे, ४२० महिने अाणि महिन्याचे दिवस म्हणजे एकूण १६८० दिवसांपैकी एकदा तरी असं होऊ शकतंच ना? त्यात इतका संकोच करण्यासारखं काय? हा संकोच येतो कुठून? लोकांच्या नजरेतून? त्यांच्या कुजबूजीतून? अापल्या वर्षानुर्षांच्या शिकवणीतून? मला फार वाईट वाटलं. बायकांच्यात मोकळेपणानं वावरु शकलेली ही बाई अाता रस्त्यानं कशी जाईल? माझ्याकडे एक शाल होती, मी पटकन पिशवीतून काढली, हाक मारली. ती मागे वळली, माझा चेहरा बघितला अाणि इतकं कानकोंडं झालं तिला की काय सांगावं. तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं. तिनी शाल घेतली आणि फोन नंबर मागितला, नवीन अाणून देईन म्हणाली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. बरं झालं मी थांबले. किमान तिला काहीतरी मदत झाली. पण निघाताना एक विचार अाला. मी या लोकांपासून कशी काय वेगळी अाहे? मी ही तिला तो डाग झाकायलाच तर शाल दिली! का?

सायली केदार