आद्या

बेल वाजली. ती लॅपटॉप ठेवून उठली. दार उघडून बघितलं तर सिलेंडरवाला आला होता. तिनी सेफटी डोअर उघडलं नाही. आत जाऊन गॅसचं पुस्तक आणि रिकामा सिलेंडर आणला. त्याला ठरलेले पैसे दिले. त्यानी हमालीचे २० रुपये मागितले. तिनी साफ नकार दिला. त्यानी सिलेंडर आत आणून द्यायला नाराजी दर्शवली. तिनी त्यावर काहीच बोलता सिलेंडर उचलला. त्याच्या चेहरा बघण्यासारखा झाला होता पण तिला तो बघण्यात रस नव्हता. तिनी आतून दार लावून घेतलं. सिंलेडर आत आणला. त्याला ट्रॉली नव्हती. तो बेसिन खालच्या स्टोरेज स्पेसमध्ये ठेवला. ती परत कामाला बसली.

ती आता गर्दीच्या रस्त्यावरच्या पार्किंगमध्ये होती. तिची गाडी एका खड्ड्यात अडकली होती. ती जोर लावून गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत होती. एक माणूस आला. तिची गाडी बाहेर ओढायला मदत करायला लागला. ती थांबली. “मी मदत नाही मागितली.” तो जरासा हसला. तरीही मदत करु लागला. पलीकडे एक काका त्यांची गाडी मागे ओढायचा प्रयत्न करत होते. “त्यांना मदत करा. त्यांना मदत लागेल.” तो तुच्छतेनी बघून म्हणाला, “त्यांना कशाला?” आणि निघून गेला.

बेडच्या खाली तिचं सोन्याचं कानातलं पडलं. ती आणि नवरा दोघं मिळून शोधत होते. बराच वेळ सापडत नव्हतं. शेवटी बेड हलवावा लागेल असं ठरलं. तो तिला म्हणाला, “जा. झाडू घेऊन ये. मी बेड सरकवतो.” ती हसली आणि म्हणाली. “मी सरकवते बेड, तू झाडू आण.” “का?” तिचं उत्तर सोप्पं आणि सरळ होतं. “ज्या बाजूनी बेड ढकलायचा आहे, त्या बाजूला मी उभी आहे. बाजूला सरक.” तो मिश्कील हसून बाजूला झाला. तिनी बेड ढकलला. लीलया. त्याला तिचा अभिमान वाटला. त्यानी कौतुक केलं. “वाह रे मेरे शेर! माय सुपरमॅन!”. ती जाऊन झाडू घेऊन आली. “शेरनी! आणि हो. सुपरवुमन.”

जिममध्ये एकानी बारला खूप वजनं लावली होती. त्याच्या काडी हातांवर तो फुगे आणायचा प्रयत्न करत होता. ती तिथे आली. त्यानी बाही वर करुन त्याच्या दंड ती आपल्याला न्याहाळत आहे का? या शोधात न्याहाळला. तिने ते केलं नाही. बारपाशी गेली. तो उपकारानी म्हणाला, “मी देतो वजन काढून.” ती म्हणाली, “नाही नको. मी घेईन adjust करुन.” तो तिच्यापेक्षा वयानी किंचित मोठा वाटत होता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. “नको. माझ्यामुळे कशाला उगाच त्रास.” त्यानी बोलता बोलता बाहेरचे पाच किलो काढले. “मदत करायचीच असेल तर काढून नको. वाढवून द्या.” ती बोलता बोलता आणखी पाच किलो घेऊन आली. आरशात बघत तिची पोझिशन घेत होती पण सबंध आरशात कुठे हातावरच्या पोट फुगवलेल्या बेडकी तिला दिसल्याच नाहीत.

ती दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी विचारलं काय होतंय? “मला सर्टिफिकेट हवंय!” “कसलं इलनेसचं?” ती चिंतेत म्हणाली, “फिटनेसचं”. “मग ब्लडटेस्ट करुया.” तिला त्यांना कसं समजवावं कळेना. “अहो तंदुरुस्त, तगडी, दणकट अाणि खणकर असल्याचं.” पुढे डॉक्टर एेकतंच होते. “जात्यावर दळणारी, विहीरीतून पाणी उपसणारी, घागरी वाहून नेणारी, चुलीसमोर तासन्तास बसणारी, तव्यावरपूर्वी लोखंडी, आता नॉनस्टिकचटके खाणारी, दरमहा मेन्स्ट्रुएशनला अपार वेदनांना सोसणारी, बाळाला नऊ महिने पोटात वाढवणारी, त्याचं वजन आपल्या मांड्यांनी पेलणारी, घर आणि आॅफिस दोन्ही सांभाळणारी, सगळ्यांचं जेवण झालं की मागून बसेपर्यंत भूक आवरुन जेवणावळी वाढणारी, आपटून आपटून धुणं धुणारी ही पूर्वीच्या काळापासून शारीरिक कष्टांनी घेरलेली स्त्री जमात नाजूक, पिचकट, अबला आहे यावर कोण आणि का विश्वास ठेवतं? चकल्या घालायला पंजात जोर लागतो. पुरण शिजवताना दंड भरुन येतात. कपडे धुताना ओंडवं बसून पायांची परीक्षा पाहिली जाते. एकही अवयव नाही जो शारीरिक परीक्षा देत नाही. हे झालं घरकाम करणाऱ्या स्त्रीयांचं. ज्यांना खास करुन मखरात बसवल्याचा आभास निर्माण केला जातो. बाहेर पडणाऱ्या स्त्रिया तर बाहेर पडणाऱ्या पुरुषांपेक्षा खास वेगळं किंवा कमी दर्जाचं असं काय करतात?  मग आम्ही पिचकट कश्या? मी पिचकट कशी? माझी स्पर्धा नाही कोणाशी. पण मला विजेतेपद हवंय. असं की माझ्या ताकदीवर कोणी शंका घेणार नाही.”

सर्टिफिकेट मिळालं नाही. ती स्वतःला सांगत राहिली जे मनात असतं, ते डोक्यात जाऊन येतं. जे डोक्यात जाऊन टिकतं ते आपलं शरीर करतं. मुलींचं डोकं आणि मन फार धारदार असतं. सुरीनी कित्येकदा कापलं तरी दुखऱ्या बोटाला बाजूला करुन गरम उलथनं धरण्याएवढं किंवा पोटातल्या कळांना विसरुन कामावर जाऊन इतरांबरोबर उभं राहणारं!