प्रेशिता

शाळेच्या रियुनियनला जाणं तिच्या जीवावर आलं होतं. बदकन कॉटवर बसून घट्ट झालेल्या ब्लाऊजची शिवण उसवताना प्रेशिताला वाटलं की काहीतरी कारण सांगावं अाणि यातून सुटका करावी. वॉट्सअॅपचे तसे अनेक तोटे. पण प्रेशिता सगळ्यात जाणवणारा हा! कोणीही उठतं अाणि मेसेज करतं. त्यांच्यापासून लांब पळायचं कसं? शाळेच्या मागे सोडून आलेल्या आठवणी जशाच्या तशा समोर येत होत्या. कोणा एका मुलीनी नंबर शोधून काढला अाणि गृपवर अॅड केलं. मग सगळ्यांना एक compulsory फोटो पाठवायला लावला. मग एक फॅमिली फोटो. मग त्यांची माहिती. शाळेत मॉनिटर असल्यानी प्रेशिताच्या सगळेच मागे लागायचे. अजून नाही आला फोटो अाणि अजून नाही आली माहिती. आता ३० वर्षांपूर्वीच्या मॉनिटरगिरीचा आता काय संबंध? पण नाही. सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यात भारी इंटरेस्ट. प्रेशिताला जाणं भाग होतं. सोडायला नवरा येणार होता. तिथे पोहोचलं की एका मैत्रिणीला मिस्ड कॉल द्यायचा होता. मग ती एकटीच बाहेर येणार होती. मग त्याची आणि नवऱ्याची ओळख करुन द्यायची होती. घरी बसणं शक्य नव्हतं कारण घरातल्यांचा आरोप होता की तू सोशलाईज होत नाहीस. घराबाहेर पडून एकटीनं एक सिनेमा बघून यावं तर नवरा सोडणार. दारातून पळून जावं तर ती अतिउत्साही मैत्रीण. म्हणजे काही विचारायलाच नको.

साडीचा सैल केलेला ब्लाऊज, कमीत कमी आवरलेलं अशा अवस्थेतील प्रेशिता गाडीतून उतरली. मुळात गाडी BMW. त्यामुळे तिची अर्धी ओळख तर आधीच झालेली. मैत्रीण आणि नवऱ्याची मैत्रिणीच्या म्हणण्याप्रमाणे झटक्यात मैत्री झाली अाणि प्रेशिता आत गेली. मैत्रीण मुग्धाही तिच्याबरोबर आत आली. साधारण ५०० बायकांचा घोळका होता. सगळया एकदम बोलत होत्या. कोणीच कोणाचं काही एेकत नाहीये असं तिला वाटलं. एक तास संपला आणि बाई बाहेर गेल्या की एकाक्षणात वर्गाचंही असंच व्हायचं याची तिला आठवण झाली!

पहिलं लिंबू सरबत चाललं होतं. तिच्याबरोबर आठवीच्या नाटकात काम केलेली मधुरा तिच्यापाशी आली. “बरीच बारीक झालीस गं. मागच्या वर्षी फोटो पाहिलेला फेसबुकवर. दिवाळीचा नाही का? पणती लावताना?” प्रेशितानी हसल्यासारखं केलं. प्रेशिताकडे तिच्याशी बोलण्यासारखं काही नव्हतं. “ब्लाऊज फारच बोअर गं. शाळेत कशी फॅशन करायचीस केसांची नेहमी. वेणीला कधी सागरवेणी, कधी झोपाळा. आता हौस राहिली नाही वाटतं!” प्रेशिताला काय बोलावं ते कळेना. “आवडतं पण हा जरा आहे साधा.” प्रेशितानी तिच्या ब्लाऊजचं निरीक्षण केलं. दोन लांब बाह्या, मागे गोल गळा. फ्रंट ओपन. यात काय फॅशन अाहे ते तिला सापडेना! तिनी दोन घोट सरबत घेतलं. ती सरबत सोडून इतरही काहीबाही घेते अाणि ते नवऱ्याला आवडतं हे ही सांगितलं. मग खऱ्या ब्लाऊजवर ती परत आली. “मुलगी मोठी झाली आहे. हल्ली तिला नको ते ही कळतं अाणि मग खरी पंचाईत होते. उगाच फॅशन केली मागच्या आठवड्यात अाणि पटकन बोलून गेली. बाबांना हे आवडतं वाटतं. म्हणे मेल्याहून मेल्यासारखं झालं.” मग मधुराला कोणीतरी हाक मारली आणि ती गेली. प्रेशिता गप्पा मारायला परत एक सावज शोधू लागली.

पनीरचे कबाब खाताना एक आपटे नावाची म्हणजे आडनावाची बाई समोर आली. तिची मुलं कशी आजारी पडतात अाणि चारलोकांत कोणी त्यांना पिचकट म्हटलं की कसं कानकोंडं होतं ते सांगून गेली. एकीचा डिवोर्स होणार होता. कोणालातरी अजून मूल होत नव्हतं. कोणाला तरी कॅन्सर डिटेक्ट झालेला. कोणीतरी लॉटरीमध्ये गाडी जिंकलं. प्रेशिताला आता या कार्यक्रमात आल्याचं फार वाईट वाटत नव्हतं. कोणाशी बोलू हा एक मोठ्ठा प्रश्न सुटला होता! सगळी लोकं आपापलीच येत होती. त्यातून बोलायची गरजच नव्हती. तिथे सगळे वक्तेच होते. त्यामुळे प्रेशिता सारख्या अशा एखाद्या श्रोत्याला फारच महत्व होते.

पहिला राऊंड आपल्या बद्दलचा झाल्यावर दुसऱ्या राऊंडला सगळे वेगळी माहिती घेऊन आले. “तुला माहितीये का? तिच्या म्हणे सासूचा तिला फार त्रास आहे.” “सारखे भांडतात. डिवोर्स नाहीतर काय होणार?!” “BMW घेतली. साध्या पोस्टवर आहे नवरा. एवढाल्ले पैसे कुठून आले कोणास ठाऊक?” “मी तर बाई सर्रळ खोटं सांगते कंबर धरली म्हणून! तू?” प्रेशितानी एक झोळी पसरुन अनंत अशा गप्पा, कागाळ्या, चुगल्या, गुपितं गिळली. कानातून, डोक्यात अाणि डोक्यातून थेट पोटात टाकलं. मध्ये मनाचा रस्ता धरलाच नाही. डोक्यातून एक वाक्य मात्र काढता आला नाही. “कोणाला सांगू नकोस बरंका!”

जेवण झाल्यावर कस्टर्ड खात खात प्रेशिता जरा त्या हॉलमध्ये फिरत होती. तिला व्हायचं होतं की माहित नाही पण आता ती त्यांच्यातलीच एक झाली होती. सगळ्यांचं तिच्याशी एक आपलेपणाचं नातं जोडलं गेलं होतं. मुग्धाला, प्रेशिताच्या त्या मैत्रिणीला आल्यापासून उसंत नव्हती. काही ना काही काम होतंच. तिचा या कार्यक्रमात मोठा वाटा होता. आता कार्यक्रम चांगला झालाय आणि संपत आलाय अशी खात्री पटल्यावर मुग्धा आली. प्रेशिताच्या शेजारी हुश्श करुन बसली. “आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला बघ!” प्रेशिताच्या चेहऱ्यावर तेच हलकं हसू आलं. प्रेशिताचा फोन वाजला. घ्यायला नवरा आला होता. दोघी दारापर्यंत आल्या. “कोणाला सांगू नकोस, पण मी कायमची ओमान शिफ्ट होईन कदाचित. तसं अजून कशात काही नाही पण हा कार्यक्रम करुन घेतला. नंतर मनात राहायला नको. सांगू नकोस हं.” तिनी परत एकदा आठवण केली. “इतक्या लवकर कशाला आलात. गप्पा संपायच्या होत्याअसं म्हणत नवीनच झालेल्या मित्राला मुग्धानी टाळी दिली. तो दचकला पण दिली टाळी त्यानी निमूटपणानी घेतली.

प्रेशिता, तिला सोशलाईज करु पाहणारा तिचा नवरा आणि रेडिओ! “मग? काय झालं कार्यक्रमात?” प्रेशिताचं तेच हलकं हसू. “भेटीगाठी, काही खास नाही.” तिनं AC बंद करुन खिडकी उघडत रेडिओचा आवाज वाढवला. गाणं कुठलं लागलं होतं कोणास ठाऊक! तिच्या डोक्यात घुमत होतं, “कोणाला सांगू नकोस हं!”